रत्नागिरी:- जिल्ह्यात होत असलेल्या कोरोना विस्फोटाला प्रशासनाबरोबरच सरकार जबाबदार आहे. येत्या आठ दिवसात जिल्ह्यातील यंत्रणा सुरळीत केली गेली नाही, तर भाजप आक्रमक पवित्रा घेत उपोषण करेल, असा इशारा उत्तर जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू आणि राज्य सचिव प्रमोद जठार यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना दिला. जिल्ह्याचे पालकमंत्री मुंबईतील विशेष कामात गुंतले असून त्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तळागाळात यंत्रणा राबविण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले.
येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी डॉ. नातू आणि प्रमोद जठार हे रत्नागिरीत आले होते. त्यावेळी कोरोनातील परिस्थितीवर पत्रकारांपुढे भाष्य केले. यावेळी भाजपचे युवा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन उपस्थित होते. ते म्हणाले, कोरोनातील टाळेबंदीच्या सहा महिन्याते काय केले पाहीजे, हेच प्रशासनाला आणि सरकारला कळले नाही. कोरोनाही ही मोठी साथ आहे, हे लक्षात घेऊन नियोजन करायला हवे होते. त्यादृष्टीने विविध पक्षाच्या प्रतिनिधींना एकत्रित घेऊन बैठकीचे नियोजन करणे आवश्यक होते. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, खासगी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी यांची बैठक झालीच नाही. कोरोना टाळेबंदीत ग्रामकृतीदल संकल्पना राबविली गेली, पण निवडणुका झालेल्या गावात मोठा गोंधळ उडाला. सत्ताधारी विरुध्द विरोधक असे चित्र गावागावात होते. हे करत असताना गावपातळीवर नियोजन करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा उभी केली असती तर त्यातून कोरोना रुग्णांचे नियोजन करणे शक्य झाले असते. पण त्यावर येथील जिल्हाधिकारी यांनी लक्षच दिले नाही. त्यामुळे आज परिस्थिती गंभीर होऊ लागली असून सर्वसामान्यांचा जीव धोक्यात आला आहे.
प्रशासकीय अधिकारी कार्यालयात बसून निर्णय घेत आहेत. त्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरुन काम करावयास हवे आहे. चिपळूण येथे रोटरी आणि काही मुस्लीम बांधवांनी मदत केल्यामुळे रुग्णालयात अत्याधुनिक साहित्य कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आणले गेले. त्याला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला गेला. हे शासकीय निधीतून करणे शक्य झाले असून पण तसा निर्णयच झाला नाही. नुसता दर्जा जाहीर करुन काहीच उपयोग नाही. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दोन जिल्हा शल्य चिकित्सक आहेत, त्यातील ज्युनिअर अधिकारी येथे पाठवला असता तर नियोजन करणे सोपे झाले असते. जिल्ह्याला आवश्यक ऑक्सीजनचा ट्रक गरज असतानाही माघारी पाठवत असतील ते कोरोना रुग्णांचे दुर्दैव आहे. अनेक रुग्णांना आज व्हेंटीलेटरची गरज भासत आहे. कोल्हापूरमधूनही ऑक्सीजन सिलेंडर आणता येत नाही. त्यामुळे प्रशासन किती कुचकामी आहे ते दिसते, असा आरोप डॉ. नातू यांनी केला. खासगी वैद्यकीय अधिकार्यांचे सहकार्य घेऊन जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये विकसित करायला पाहीजे होते. जिल्ह्यात एमबीबीएस, बीएचएमएस, बीडीएस आणि दंत महाविद्यालय आहे. तेथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स्ना हाताशी धरुन यंत्रणा हाकली असती नियंत्रण शक्य होते.









