रत्नागिरी:- तळकोकणात मॉन्सुनचे आगमन झाले असले तरीही रत्नागिरी जिल्हावासीयांना अजून प्रतीक्षाच आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी राजापूर तालुक्यात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला असून रत्नागिरीत किनारी भागात वेगवान वारे वाहत होते. मोसमी पावसाला पोषक वातावरण रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण झालेले आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी ४.३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात गुहागर १.७०, चिपळूण ११.७०, संगमेश्वर ६.७०, रत्नागिरी ३.७०, लांजा ५.२०, राजापूर ८.८० मिमी पाऊस झाला आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता आहे.
शनिवारी रत्नागिरीत हलका पाऊस झाला. त्यानंतर रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागात गार वारे वाहू लागले आणि काहीठिकाणी हलक्या सरीही पडून गेल्या. परंतु या पावसाला जोर नव्हता. संगमेश्वर, लांजासह चिपळूण तालुक्यात पावसाचे वातावरण होते. मात्र दापोली, खेड, मंडणगड तालुक्यात उन पडलेले होते. राजापूर तालुक्यात सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे उष्म्याने होरपळलेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. वीजांचा कडकडाट सुरु झाल्यामुळे प्रशासनाने नागरीकांना सतर्केताच इशारा दिला आहे.
दरम्यान, समुद्रकिनारी वारे वाहू लागले असून लाटांचा वेगही वाढलेला आहे. किनारीपट्टीवर पाण्याचा रंग गडद आणि भडक होऊ लागला आहे. लाटांचा फेस किनाऱ्यावर येत आहे. हे मॉन्सुन सक्रीय होण्याचे संकेत आहेत, असा अंदाज किनाऱ्यावरील जाणकारांनी मांडला आहे.









