मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथे महसूल विभागाने जप्त करून ठेवलेला सुमारे १ लाख ८५ हजार ५०० रुपये किमतीचा वाळू साठा अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकारणी मंडणगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी रोजी महसूल विभागाने म्हाप्रळ येथे अनधिकृत गौण खनिज साठ्यावर कारवाई केली होती. या कारवाईत एकूण ६०८ ब्रास वाळू आढळून आली होती. ही वाळू दोन पंचांच्या समक्ष जप्त करून म्हाप्रळ येथेच सुरक्षित ठेवण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी तहसीलदार मंडणगड यांनी मंडल अधिकारी विशाल तानाजी चौगले यांना या जप्त वाळूचे मोजमाप घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मोजमाप केले असता, त्यातील काही वाळू चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. ११ फेब्रुवारी ते २४ मार्च या कालावधीत अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने ही वाळू चोरून नेली.
चोरट्यांनी जमीन गट क्र. ८४/१ मधील १७ ब्रास वाळू, महादेव नाला शेजारील: ३६ ब्रास वाळू अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणची एकूण १,८५,५०० रुपये किंमतीची वाळू चोरली आहे.
याप्रकरणी म्हाप्रळचे मंडल अधिकारी विशाल तानाजी चौगले (वय ३७) यांनी फिर्याद दिली आहे. तहसीलदार कार्यालयाकडून प्राप्त झालेली पत्रे आणि अपूर्ण माहितीची पूर्तता झाल्यानंतर, १२ मे रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा र.नं. ५२/२०२६ नुसार दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. सरकारी निगराणीत असलेली जप्त वाळूच चोरीला गेल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.









