चैनीसाठी गाड्यांची चोरी करणार्‍या दोघांच्या मुसक्या आवळल्या 

७ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त; एक दिवसाची पोलीस कोठडी

रत्नागिरी:- शहरात वायफाय केबल ऑपरेटरचे काम करणाऱ्या दोन तरुणांनी चैनीसाठी स्वतःच्या मजेसाठी मोटार, दुचाकी चोरी केल्या. वाहन चोरीचे मास्टर माईंड दोघेही पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठून त्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडील ७ लाख ८० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांना न्यायालयाने दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर पुन्हा आणखी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

प्रथम जयेश खानविलकर (वय १९, रा. लक्ष्मी कृपा शांतीनगर, नाचणे, रत्नागिरी) आणि आयुष संतोष भागवत (वय १९, रा. टीआरपी, सह्याद्रीनगर नाचणे, रत्नागिरी) अशी संशयिताची नाव आहेत. ही घटना ८ ते १४ डिसेंबर रात्री अकराच्या सुमारास साईनगर-कुवारबाव येथे घडली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत धाकटू शिंदे (वय ६८, रा. साईस्नेह आयटीआय सोसायटी, साईनगर-कुवारबाव, रत्नागिरी) यांच्या घरी संशयित प्रथम खानविलकर वायफायचा ऑपरेटर म्हणून काम गेला होता. त्याने शिंदे यांच्या घरातील चावी चोरुन नेली होती. त्यानंतर ते घरात नसताना त्यांच्या आवारात जाऊन त्यांची मोटार (क्र. एमएच-०८ एएन ६८०८) चोरुन नेली. या प्रकरणी शिंदे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरुन पोलिसांना अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

तपासात गोपनिय माहिती मिळाल्यावर शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनीत चौधरी च्या टीमने पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे व त्यांची टीम हवालदार गोसावी प्रवीण बर्गे पोलीस नाईक संकेत महाडिक मनवल, पडळकर ,हवालदार अमोल भोसले मनोज लिंगायत  भालेकर या टीम मोटार चोरीस गेलेल्या शिंदेंच्या घरी गेले. खात्री करण्यासाठी गाडी चोरी विषयी विचारले असता संशयिताने उडावा उडवीची उत्तरे दिली. अधिक विश्वासात घेऊन विचारले असता त्याने गुन्ह्यातील गाडी चोरल्याचे कबूल केले व गाडी भाड्याने रहात असल्याठिकाणी पार्क केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दोन पंचाना आदीनाथ नगर येथे उपस्थित राहण्यास सांगून त्याठिकाणी पार्क केलेली मोटार खानविलकर याने दाखविली.यावेळी पोलिसांनी पंचा समक्ष घराची झडती घेतली असता खानविलकर यांच्या घरात वाहनांच्या वेगवेगळ्या नंबर प्लेट दिसून आल्या. तसेच अन्य साहित्य व महाराष्ट्र शासन चे ओळखपत्र व महाराष्ट्र शासनाची पट्टी असे साहित्य दिसून आले. पुन्हा चौकशी केली असता प्रथम खानिवलकर याने दुचाकी चोरी केल्यानंतर संशयित आयुष भागवत यांचे सहकार्याने नंबर प्लेट बदलून विल्हेवाट लावत असल्याचे पंचासमक्ष सांगितले. तसेच चोरीच्या सगळ्या गाड्यांवर श्री कालभैरव नावाचा सिम्बॉल वापरत असे. गाडीच्या किल्ल्या चोरून तो पार्किंग मधल्या गाड्या चोरत असे यामुळे रत्नागिरीत  पूर्वी ज्या  गाड्या चोरीला गेलेल्या आहेत .त्यात याचा काही  संबंध लागतो का याचा तपास पोलिस करत आहेत. केवळ  स्वतःच्या चैनीसाठी मौजेसाठी प्रथम खानविलकर हे सगळं करत होता. पोलिसांनी मोटार व दुचाकी असा ७ लाख ८० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोघा संशयितांना रविवारी (ता.१८) अटक केली. न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज न्यायालयाने दोघा संशयिताना आणखी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.