लोखंडी सळईने मारहाण करून घराला आग लावण्याची धमकी
राजापूर:- राजापूर तालुक्यातील कोळंब तांबळवाडी येथे जमीन आणि मालमत्तेच्या जुन्या वादातून एका ६३ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीवर त्यांच्याच चुलत भावाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश रामभाऊ पाटेकर (वय ६३, व्यवसाय सेवानिवृत्त, रा. कोळंब, तांबळवाडी, ता. राजापूर) यांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी विजय शंकर पाटेकर (वय ४५, रा. कोळंब, तांबळवाडी, ता. राजापूर) हा फिर्यादी सुरेश पाटेकर यांचा चुलत भाऊ आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेश पाटेकर यांनी काही वर्षांपूर्वी विक्रम पांडुरंग पाटेकर यांच्याकडून सुमारे २० गुंठे जमीन विकत घेतली होती. याच जमिनीतील ६ गुंठे जागेवरून आरोपी विजय पाटेकर हा सुरुवातीपासून वाद घालत होता. परंतु, गेल्या काही दिवसांपासून तो फिर्यादीकडे संपूर्ण २० गुंठे जमीन मागत असल्याने दोघांमध्ये तीव्र स्वरूपाचे वाद सुरू होते.
घटनेच्या दिवशी, दिनांक ०६ ऑक्टोबर रोजी रात्री अंदाजे २२.३० वाजताच्या सुमारास, फिर्यादी सुरेश पाटेकर हे गावातील भोवड महाराजांच्या पुण्यतिथीचा कीर्तन कार्यक्रम संपवून काही सहकाऱ्यांसोबत (दत्ताराम बाबु सुतार, शांताराम धावले आणि बळीराम बोलये) पायी चालत घरी जात होते. कोळंब गावातील ‘डंगाचा माळ’ या ठिकाणी आले असताना, पाठीमागून आलेल्या आरोपी विजय पाटेकर याने अचानक फिर्यादींवर हल्ला केला.
आरोपी विजय पाटेकर याने लोखंडी सळई वापरून फिर्यादी सुरेश पाटेकर यांच्या उजव्या खांद्यावर आणि डाव्या हातावर गंभीर मारहाण केली. या हल्ल्यामुळे फिर्यादी खाली कोसळले आणि त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्यालाही मार लागून दुखापत झाली. मारहाण करताना आरोपी “तुला जमीन पाहिजे ना, तुझी जमीन तुला देतो” असे बोलत होता. यानंतर आरोपीने फिर्यादींना अश्लील शिवीगाळ केली आणि “तुझे घर जाळून टाकतो, तुला मारून टाकतो” अशी धमकी देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
जखमी अवस्थेत असलेल्या सुरेश रामभाऊ पाटेकर यांनी दुसऱ्या दिवशी, दिनांक ०७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०५.३५ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेतली असून, आरोपी विजय शंकर पाटेकर याच्या विरोधात भा.दं.वि. कलम ११८(१), ३५२, ३५१(१) अंतर्गत गु.र.क्र. २०५/२०२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे कोळंब तांबळवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.









