Wednesday, September 30, 2026
spot_img
Home गुन्हेगारी चुलत्याला पुतण्याकडून दांडक्याने बेदम मारहाण

चुलत्याला पुतण्याकडून दांडक्याने बेदम मारहाण

राजापूर ओझर राबंडवाडी येथील घटना

राजापूर:- राजापूर तालुक्यातील ओझर राबंडवाडी येथे रस्त्याने चालत जाणाऱ्या ७५ वर्षीय चुलत्याला अकारण शिवीगाळ करत पाठीमागून लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करणाऱ्या पुतण्याविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अचानक झालेल्या मारहाणीत वयोवृद्ध चुलते जखमी झाले असून, पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदवला आहे. राजेंद्र राजाराम वालम (वय ३७ वर्षे, रा. ओझर तांबळवाडी, ता. राजापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या पुतण्याचे नाव आहे.

या संदर्भात मूळचे ओझर तांबळवाडी येथील रहिवासी व सध्या अंधेरी (मुंबई) येथे वास्तव्यास असलेले झिमाजी हरी वालम (वय ७५) यांनी राजापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि संशयित आरोपी हे नात्याने चुलत काका-पुतणे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास फिर्यादी झिमाजी वालम हे त्यांचे चुलत भाऊ दत्ताराम केशव वालम आणि शेजारी प्रदीप विठोबा मालपेकर यांच्या समवेत राबंडवाडीतील रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी समोरून येणारा पुतण्या राजेंद्र वालम याने फिर्यादींना पाहून अश्लील शब्दांत शिवीगाळ केली.

या शिवीगाळीचा जाब विचारत ‘कशाला शिवी देतोस?’ असे विचारले असता राजेंद्र तेथून काही न बोलता निघून गेला. मात्र, थोड्याच वेळात फिर्यादी काही अंतरावर पुढे जात असताना, राजेंद्रने मागून येऊन हातातील लाकडी दांडक्याने झिमाजी वालम यांच्या डाव्या बाजूला कंबरेवर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात वृद्ध झिमाजी वालम जबर जखमी झाले. घटनेनंतर त्यांनी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून राजापूर पोलिसांनी संशयित आरोपी राजेंद्र वालम याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१) आणि ३५२ अन्वये दुखापत व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.