Saturday, June 6, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मुलाने लोखंडी पाटा मारून वृद्ध आईला केले गंभीर जखमी

मुलाने लोखंडी पाटा मारून वृद्ध आईला केले गंभीर जखमी

गुहागर:- पूर्वी केलेल्या पोलीस तक्रारीचा राग मनात धरून एका कलियुगी पुत्राने आपल्या ६६ वर्षीय वृद्ध आईवर लोखंडी पाटा फेकून मारत तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गावडेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात संशयित मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पार्वती शंकर गावडे (वय ६६, रा. पाटपन्हाळे गावडेवाडी, ता. गुहागर) या ४ जून रोजी सकाळी ०८.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी हजर होत्या. याच दरम्यान त्यांचा मुलगा आणि या प्रकरणातील संशयित राजेंद्र शंकर गावडे (वय ४२, सध्या रा. दिवा, जि. ठाणे) हा तिथे आला. संशयित राजेंद्र याला दारूचे व्यसन असून, तो नेहमी दारू पिऊन आईला शिवीगाळ, धमकी आणि मारहाण करायचा. या त्रासाला कंटाळून पार्वती गावडे यांनी पूर्वी गुहागर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दिली होती.

आपल्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार का दिली, याचा तीव्र राग संशयित राजेंद्रच्या मनात होता. याच रागातून ४ जून रोजी सकाळी त्याने घरात असलेला लोखंडी गाडीचा पाटा उचलला आणि थेट आईच्या ढोपराच्या खाली पायावर मारून त्यांना गंभीर दुखापत केली. एवढ्यावर थांबला नाही, तर त्याने आईला अश्लील शिवीगाळ करत ‘पोलीसात तक्रार देतेस काय?’ असे म्हणून पुन्हा मारण्याची धमकी दिली.

या जीवघेण्या हल्ल्यानंतर जखमी वृद्ध आई पार्वती गावडे यांनी गुहागर पोलीस ठाणे गाठून मुलाच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार ४ जून रोजी सायंकाळी ५.१३ वाजता गुहागर पोलिसांनी संशयित मुलगा राजेंद्र गावडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(२), ३५१(२), ३५२ आणि गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९/२०२६ नुसार गंभीर दुखापत व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत.