Friday, August 14, 2026
spot_img
Home गुन्हेगारी चिपळुणात ज्येष्ठ नागरिकाची ५ लाख २६ हजारांची फसवणूक

चिपळुणात ज्येष्ठ नागरिकाची ५ लाख २६ हजारांची फसवणूक

एसबीआय युनो ॲपच्या नावाखाली ऑनलाईन गंडा

चिपळूण:- चिपळूणमधील महालक्ष्मी नगर येथील ८६ वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाची एसबीआय युनो ॲपच्या ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून ५ लाख २६ हजार २७९ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कविश्वर कृष्णाजी बापट (वय ८६, रा. महालक्ष्मी नगर, खंड चिपळूण) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

दिनांक ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते ८ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान फिर्यादी घरी असताना एका अज्ञात इसमाने त्यांच्या मोबाईलवर फोन केला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण एसबीआय युनो ॲपच्या ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगत फिर्यादीकडून बँकेच्या खात्याची माहिती व इतर तपशील मागवून घेतला.
​त्यानंतर आरोपीने मोबाईल हॅक करून फिर्यादीच्या एसबीआयच्या बचत खात्यातून परस्पर ५ लाख २६ हजार २७९ रुपयांचे व्यवहार करत ही रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी लाटली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी १२ ऑगस्ट रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली.

या प्रकरणी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(२) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.