Saturday, May 2, 2026
spot_img
Home गुन्हेगारी चिखलगाव पोस्ट ऑफिसमध्ये अपहार; महिला पोस्टमास्तर विरुद्ध गुन्हा

चिखलगाव पोस्ट ऑफिसमध्ये अपहार; महिला पोस्टमास्तर विरुद्ध गुन्हा

दापोली:- शाखा पोस्टमास्तर पदाचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातील रकमेवर डल्ला मारणाऱ्या एका महिला पोस्टमास्तर विरुद्ध गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन २०२० मध्ये झालेल्या या आर्थिक अपहारप्रकरणी तब्बल साडेपाच वर्षांनंतर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

आरोपी श्रीमती सोनिया संदेश तेलप (वय २६, रा. मळे वरची वाडी, दापोली) या ९ जुलै २०२० ते १७ ऑगस्ट २०२० या कालावधीत दापोली तालुक्यातील चिखलगाव येथील ‘आउट साइड शाखा’ पोस्टमास्तर म्हणून कार्यरत होत्या. या पदावर असताना त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून तीन खातेदारांच्या खात्यातील एकूण ३६,६०० रुपयांचा अपहार केला.

​आरोपीने निलेश गोविंद घडवते, लक्ष्मी सखाराम शिगवण, सरिता गजानन कांबळे या खातेदारांच्या संमतीशिवाय व बनावट मार्गाने त्यांच्या खात्यातून पैसे काढून स्वतःच्या फायद्यासाठी वापरले आणि शासनाची फसवणूक केली, असे तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी गुहागरचे डाकघर निरीक्षक हिंमाशू हरिश्चंद्र जोशी (वय २६) यांनी २३ जानेवारी रोजी रीतसर फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुहागर पोलिसांनी आरोपी सोनिया तेलप यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ४०९ (शासकीय नोकराद्वारे विश्वासघात आणि मालमत्तेचा अपहार) नुसार गुन्हा दाखल केला आहे.