रत्नागिरी:- तालुक्यातील चांदेराई मलुष्टेवाडी येथील बंद घर फोडत अज्ञात चोरट्याने घरातील 1 लाख 14 हजार 500 रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. या चोरी प्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चोरी बाबत राहुल शैलेश मलुष्टे (27, रा. चांदेराई) यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी व त्यांची आई अपर्णा हे दोघेजण १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच ते साडेसहा या कालावधीत कामाला गेलेले असल्याचा फायदा घेवुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे घराचे पाठीमागील दरवाजाला जोराने धक्का मारुन तोडला. आतील कडी उचकटुन पाठी मागुन घरामध्ये प्रवेश करुन माजघरातील लोखंडी कपाट कोणत्यातरी हत्याराने उचकटुन कपाटातील अडीच तोळ्याचा हार, 10 ग्राम वजनाची सोन्याची चैन, दीड ग्राम वजनाची सोन्याची पाने, चांदीचा करंडा आणि 18 हजारांची रोख रक्कम असा एकूण 1 लाख 14 हजार 500 रुपयांचा माल चोरून नेला. या चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.