चक्क गोडावून कीपरनेच केली पाच सिलिंडरची अवैध विक्री

रत्नागिरी:- शहरातील एका गॅस एजन्सीतील गोडावून कीपरने पाच व्यावसायिक गॅस सिलिंडरची अवैध विक्री केल्याप्रकरणी या एजन्सीकडून जिल्हा प्रशासनाकडे तसेच शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यापैकी चार सिलिंडर परत घेण्यात आले आहेत.

देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत व्हावा, या उद्देशाने सध्या सर्वत्रच व्यावसायिक सिलिंडर विक्री करण्यास कंपनीने बंदी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातही सध्या व्यावसायिक सिलिंडरची विक्री बंद ठेवण्यात आली आहे. तशा सूचना सर्व गॅस एजन्सीजना देण्यात आल्या आहेत. मात्र, शासकीय रुग्णालये, शालेय पोषण आहार, वसतिगृहे आदी महत्त्वाच्या सेवांसाठी व्यावसायिक सिलिंडर पुरवण्याचे निर्देशही या गॅस एजन्सीजना देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील २९ गॅस एजन्सीजकडून केवळ घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जात आहे. मात्र, काही महत्त्वाच्या सेवांसाठी एजन्सीजकडे व्यावसायिक सिलिंडरचा काही साठा आरक्षित ठेवण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार काही महत्त्वाच्या सेवांना १०० टक्के तर काहींना ठराविक प्रमाणात व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा केला जातो. यासाठी या एजन्सीजकडे काही सिलिंडरचा पुरवठा करण्यात येतो.

यानुसार शहरातील रत्नागिरी गॅस एजन्सीकडे २४ व्यावसायिक सिलिंडरचा साठा होता. यापैकी गोडावून कीपरने एजन्सीच्या व्यवस्थापकांना कल्पना न देता त्यातील ५ सिलिंडरची परस्पर विक्री केली. हे निदर्शनात येताच या एजन्सीने त्यापैकी चार सिलिंडर परत मिळवले आहेत. याप्रकरणी संबंधित गोडावून कीपरविरोधात जिल्हा पुरवठा विभागाकडे व्यवस्थापक प्रीती राज यांनी तक्रार नोंदवली असून, शहर पोलिस ठाण्यातही तक्रार दिली आहे.