Saturday, July 18, 2026
spot_img
Home गुन्हेगारी नोकरीच्या आमिषाने तरुणीची १० लाखांची फसवणूक

नोकरीच्या आमिषाने तरुणीची १० लाखांची फसवणूक

दापोली येथील घटना

दापोली:- वर्कइंडीया या वेबसाईटवर नोकरीसाठी अर्ज केलेल्या दापोलीतील एका २२ वर्षीय तरुणीची अज्ञात भामट्यांनी १० लाख ३०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींनी नोकरीचे अमिष दाखवून फिर्यादी तरुणीला आर्थिक जाळ्यात ओढले.

फिर्यादी महेक मुबीन ऐनरकर यांनी ४ जून २०२६ रोजी वर्कइंडीया या वेबसाईटवर नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज केला होता. त्यानंतर त्यांना व्हॉट्सॲपवर नोकरीच्या कामाचे एक ॲग्रीमेंट प्राप्त झाले. मात्र, हे काम फिर्यादींना पसंत नसल्याने त्यांनी ॲग्रीमेंट रद्द (कॅन्सल) करण्याची विनंती केली होती. हीच संधी साधून अज्ञात आरोपींनी फिर्यादींच्या मोबाईलवरून गुगल पे, फोन पे आणि इतर ऑनलाईन माध्यमातून ६ जून ते १२ जुलै या कालावधीत विविध बँक खात्यांवर एकूण १० लाख ३०० रुपये भरून घेतले. वारंवार पैसे भरूनही आरोपींनी ॲग्रीमेंट रद्द केले नाही आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली.

या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०८, ३१८(४), ३१९(२) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. ऑनलाईन नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या अशा फसवणुकीच्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून ऑनलाईन व्यवहार करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.