१२ हजार रुपये उकळून भामटा पसार
राजापूर:- शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून ग्रामीण भागातील महिलांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. राजापूर तालुक्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, घरघंटी योजनेच्या नावाखाली एका महिलेकडून १२ हजार रुपये उकळून एक भामटा पसार झाला आहे. या घटनेमुळे पीडित महिला आणि तिच्या कुटुंबियांत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने पंचायत समितीकडे घरघंटीसाठी अधिकृत अर्ज केला होता. त्यावेळी अर्जावर कोणतीही खात्रीशीर कारवाई झालेली नसतानाही, अवघ्या १५ दिवसांत तिच्या घरी एक व्यक्ती घरघंटी घेऊन हजर झाली. आपण लांजावरून आलो असल्याचे सांगत, त्या व्यक्तीने महिलेला भूलथापा दिल्या. “तुमच्या खात्यात काही दिवसांत शासनाचे पैसे जमा होतील, ते तुम्ही आम्हाला काढून द्या,” असे त्याने सांगितले. विशेष म्हणजे, या संपूर्ण व्यवहारादरम्यान त्या व्यक्तीने कोणतेही ओळखपत्र, अधिकृत मंजुरीपत्र, बिल किंवा पावती दिली नाही.
काही दिवसांनी महिलेच्या बँक खात्यात १७ हजार रुपये जमा झाले. खात्यात पैसे जमा झाल्याची बातमी मिळताच, तो भामटा पुन्हा महिलेच्या घरी धडकला. वारंवार होणाऱ्या मागणीला आणि दबावाला कंटाळून महिलेने त्यातील १२ हजार रुपये काढून त्या व्यक्तीच्या स्वाधीन केले. पैसे घेतल्यावर, “आमचा माणूस येऊन घरघंटी बसवेल आणि सर्व तांत्रिक माहिती देईल, तोपर्यंत घरात विजेची सोय करा,” असे सांगून तो निघून गेला.
पैसे देऊन तीन महिने उलटले, तरीही संबंधित व्यक्ती पुन्हा फिरकलेली नाही. घरघंटी बसवण्यासाठी कोणीही आले नाही आणि उर्वरित ५ हजार रुपयांचीही मागणी झाली नाही. आता घरघंटी घरात पडून असून, तिचे काय करायचे, ती नादुरुस्त झाल्यास दुरुस्त करून कोणाकडे जायचे, वॉरंटीचे काय आणि हा व्यवहार नेमका कशाचा होता, असे अनेक प्रश्न त्या महिलेसमोर उभे राहिले आहेत. या प्रकारामुळे महिलेच्या घरातील वातावरण तणावपूर्ण झाले असून, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुटुंबात खडाजंगी सुरू झाली आहे.









