आतापर्यंत ५०० हून अधिक किलो ऐवज जप्त
खेड:- रत्नागिरीसह रायगड जिल्हयातील विविध ठिकाणच्या मंदिरातून झालेल्या धातूच्या पितळी घंटा, समई व इतर ऐवज चोरीप्रकरणी येथील पोलिसांनी अटक केलेल्या राकेश तुळशीराम पडवकर (लोणावळा), जगलाल केवट (उत्तरप्रदेश), हिरालाल कुम्हार (पनवेल) यांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंत ५०० हून अधिक किलो ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. चोरीप्रकरणात आणखी काहींच्या सहभागाचा पोलिसांना संशय असून पथके त्यांच्या मागावर आहेत.
तालुक्यातील शिरगाव खुर्द-शिवाजीनगर येथील श्री काळकाई मंदिराची पितळी घंटा चोरीप्रकरणाचा येथील पोलिसांनी छडा लावण्याची कौतुकास्पद कामगिरी पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी केली आहे. तिघांच्या अटकेने आतापर्यंत रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील १६ चोऱ्यांचा उलगडा झाला आहे. अटकेतील राकेश पडवकर आणि जगलाल केवट हे दोघे अट्टल चोरटे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
या दोघांनी मंदिरातून चोरलेल्या धातूच्या पितळी घंटा व अन्य ऐवज हिरालाल गंगारामजी कुम्हार याने घेतल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे. आणखी ऐवज पोलिसांच्या हाती लागण्याची दाट शक्यता आहे. आणखी काहींचा सहभाग असण्याच्या शक्यतेने पथकाने तपास गतीमान केला आहे. या पथकात पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल अजय कडू वैभव ओहोळ, विजेंद्र सातार्डेकर, कृष्णा दराडे, शिरीष साळुंके यांचा समावेश आहे.









