Saturday, June 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी चिपळूण-सावर्डे अपहरण प्रकरणात पाच जणांना अटक

चिपळूण-सावर्डे अपहरण प्रकरणात पाच जणांना अटक

चिपळूण:- पैशांच्या वादातून दोन तरूणांचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार चिपळूण व सावर्डे येथे घडला होता. यातील चिपळूण प्रकरणी पुण्यातून एका तरूणाला अटक केली आहे. मात्र, तिघेजण पसार झाले आहेत. तर सावर्डेतील अपहरण प्रकरणी चौघांना अटक झाल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रतीक भोसले ( ३०, रा. येरवडा-पुणे) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. प्रकाश मार्तंडराव पवार ( ७०, रा. काविळतळी) यांचा मुलगा शुभम पवार (२९) याचे दोन दिवसांपूर्वी शहरातील मार्कंडी येथून अपहरण झाले होते. मात्र, त्यानंतर त्याचा मोबाईल बंद होता. तसेच संशयित आरोपी प्रतीक भोसले याचाही मोबाईल बंद होता. त्यामुळे तपासात अडचणी येत होत्या. मात्र, पुणे येथील पोलिसांमार्फत त्याचा शोध सुरू होता. त्याची कुणकुण प्रतीक भोसले याला लागताच तो स्वतः फलटण येथील लोणंद पोलीस ठाण्यात स्वतः शुभम पवार याच्यासोबत हजर झाला. त्यानंतर तेथील पोलिसांनी दोघांनाही चिपळूण पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रतीक भोसले याला येथील न्यायालयात शुक्रवारी हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शुभम पवार हा क्रशर चालवित होता. त्यासाठी त्याने प्रतीक भोसले याच्याकडून २० लाख रूपये घेतले होते. त्या मोबदल्यात सुरुवातीच्या टप्प्यात पाच लाख देतो, असे त्याने कबूल केले होते. मात्र, तेही न दिल्यामुळे शुभमचे अपहरण करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती प्रतीक भोसले याने पोलिसांना दिली आहे. त्याच्यासोबत अन्य तिघांचा समावेश असून ते अद्याप पसार आहेत.

सावर्डे बाजारपेठेत ३ एप्रिल रोजी वीस वर्षीय सिद्धेश मारुती शिंगरे याचे अपहरण झाले होते. या प्रकरणी संशयित आरोपी तेजस गायकवाड, शुभम गायकवाड, राजू गायकवाड व विनोद टक्के ( सर्व रा. मुंबई) यांनी संगनमताने संबंधित तरुणाचे अपहरण केले होते. मात्र, पोलिसांनी मुंबई येथून या चौघांनाही ताब्यात घेतले असून त्यांना अटक केली आहे. शुक्रवारी त्यांनाही न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.