नारंगी फाट्याजवळील घटना
खेड:- तालुक्यातील नारंगी फाट्याजवळ गुरांची अवैध वाहतूक केल्याच्या संशयावरून एका तरुणासह त्याच्या सहकाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांचा भाऊ जखमी झाले असून, खेड पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवार, दिनांक १३ मे रोजी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास नारंगी फाट्याजवळ हा प्रकार घडला. फिर्यादी रुतिक सुनील जाधव (वय २६, मूळ रा. चिंचघर-प्रभुवाडी, सध्या रा. विरार, मुंबई) यांचा भाऊ सुरज जाधव हा गाडीतून जात असताना, तो गाडीत गुरे भरून वाहतूक करत असल्याचा संशय आरोपींनी व्यक्त केला.
या संशयावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी सुरज जाधव याला कोणत्या तरी साधनाने कपाळावर आणि डाव्या डोळ्याच्या भुवईवर मारून गंभीर जखमी केले, ज्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला.
भावाला वाचवण्यासाठी गेलेले फिर्यादी रुतिक जाधव यांनाही आरोपींनी बांबूच्या काठीने मारहाण केली, ज्यामध्ये त्यांच्या उजव्या खांद्याला गंभीर मुका मार लागला आहे. तसेच फिर्यादींचे मित्र तेजस शेलार, प्रणय शेलार, जीवन कडू आणि विकी जाधव यांनाही आरोपींनी धक्काबुक्की करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. याप्रकरणी रुपेश निंबाळकर (रा. चिंचघर, प्रभुवाडी, ता. खेड), रिक्षावाला चव्हाण, खेडेकर (रा. चांभारवाडी, ता. खेड) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी रुतिक जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११५(२), ११८(१), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. नारंगी फाट्यावर गुरांच्या वाहतुकीच्या संशयावरून झालेल्या या हिंसक वादामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









