अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
लांजा:- लांजा तालुक्यातील खेरवसे येथे एका विहिरीवर ठेवलेला पाण्याचा पंप, फवारणीची औषधे आणि पेट्रोल-ऑईल अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी कुलदीप नामदेव गायकवाड (वय ४० वर्षे, मूळ रा. नांदेड, सध्या रा. माऊली नगर, लांजा) हे लांजा येथे महसूल विभागात नोकरीला आहेत. त्यांची खेरवसे येथे गट क्र. ६८१ मध्ये जमीन आहे. २३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६:०० ते २४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास, त्यांच्या विहिरीवर असलेला ३ एचपी क्षमतेचा होंडा कंपनीचा पाण्याचा पंप (मॉडेल नं. WB 15X) अज्ञात चोरट्याने चोरून नेला. पंपासोबतच चोरट्याने विहिरीपाशी उघड्यावर ठेवलेले १ लिटर बुरशीनाशक औषध, २ लिटर पेट्रोल आणि अर्धा लिटर ऑईल असा एकूण ८,७०० रुपये किमतीचा माल लंपास केला आहे.
ही घटना डिसेंबर २०२५ मध्ये घडली असली, तरी याची तक्रार २५ फेब्रुवारी २०२६ रोजी दाखल करण्यात आली. फिर्यादी गायकवाड हे महसूल विभागात कार्यरत असून, नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कर्तव्यावर असल्याने त्यांना वेळ मिळाला नाही. निवडणुका संपल्यानंतर ते आपल्या मूळ गावी (नांदेड) गेले होते. गावाहून परतल्यानंतर त्यांनी लांजा पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली आहे.
लांजा पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









