खेड येथून 70 गावठी बॉम्बसह एका आरोपीला बेड्या

रत्नागिरी पोलिसांची कारवाई, जिल्ह्यात खळबळ

रत्नागिरी:- रत्नागिरी पोलिस दलामार्फत बेकायदेशीर स्फोटक पदार्थांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत एक इसम अटकेत घेण्यात आला आहे. त्याच्याकडून तब्बल 70 जिवंत गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईने रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडवणारी ठरली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक खेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना खेड–मंडणगड रस्त्यावर मौजे मुरगज येथे सायंकाळी सुमारे 5.25 वाजता संशयास्पद हालचाल करणाऱ्या एका इसमास ताब्यात घेण्यात आले.

तपासादरम्यान सदर इसमाचे नाव प्रकाश राम जगताप (वय 33), रा. शिरसाळे, ता. दापोली, जि. रत्नागिरी असे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या ताब्यातून बेकायदेशीररित्या बाळगलेले 70 जिवंत गावठी बॉम्ब तसेच एक चारचाकी वाहन असा एकूण 2 लाख 35 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सार्वजनिक सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या प्रकाराबाबत आरोपीविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 15/2026 अन्वये भारतीय स्फोटक कायदा 1908 कलम 5 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 288 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास दापोली पोलीस ठाणे करीत आहे.

बेकायदेशीर स्फोटक पदार्थांविरोधात कठोर पावले उचलण्यात येत असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा डायल 112 या क्रमांकावर कळवावी, असे आवाहन रत्नागिरी पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.

ही कारवाई कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महाजन तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन हेरे यांच्या मार्गदर्शनाखाली खाली श्रेणी पो.उपनि. प्रशांत बोऱकर, पो.हवा. विजय आंबेकर, पो.हवा. योगेश नांदकर, पो.हवा. दिपक पाटील, पो.हवा. सत्यजित देवरकर, चा.पो.शी. अतुल कांबळे यांनी केली.