Tuesday, July 7, 2026
spot_img
Home खेड खेड दहिवलीत भीषण भूस्खलन: ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा शोध सुरू

खेड दहिवलीत भीषण भूस्खलन: ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा शोध सुरू

एकाची सुखरूप सुटका

खेड:- रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका खेड तालुक्याला बसला असून दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री भीषण भूस्खलनाची घटना घडली. या दुर्घटनेत घराचा काही भाग कोसळून तिघेजण ढिगाऱ्याखाली अडकले. त्यापैकी ७५ वर्षीय कल्पना शेलार यांची ग्रामस्थांनी तत्परतेने सुखरूप सुटका केली असून त्यांच्यावर कळबणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र ८५ वर्षीय शांताराम बाळा शेलार आणि ३५ वर्षीय सतीश शेलार यांचा शोध मंगळवारी उशिरापर्यंत सुरू होता.

सोमवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डोंगराचा काही भाग अचानक कोसळून शेलार कुटुंबाच्या घरावर माती व दगडांचा मोठा ढिगारा आला. घराचा काही भाग क्षणात जमीनदोस्त झाल्याने घरातील तिघेही ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. स्थानिकांच्या प्रयत्नांतून कल्पना शेलार यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर त्यांना तातडीने कळबणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने यंत्रणा घटनास्थळी रवाना केली. प्रांताधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार, खेड पोलीस, महसूल विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ढिगारा हटवून बेपत्ता दोघांचा शोध घेण्यासाठी यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाची मदत घेण्यात येत आहे.

दरम्यान, परिसरात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. डोंगराळ भागातील माती सैल झाल्यामुळे आणखी भूस्खलन होण्याचा धोका कायम असल्याने प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. शेलारवाडीसह परिसरातील काही घरे धोकादायक स्थितीत असल्याचे प्राथमिक पाहणीत आढळून आले असून नागरिकांनी अनावश्यकपणे घराबाहेर पडू नये, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.