Wednesday, May 20, 2026
spot_img
Home खेड खेड कळंबणी पुलावर ‘हिट अँड रन’

खेड कळंबणी पुलावर ‘हिट अँड रन’

अज्ञात चारचाकीच्या धडकेत पुण्यातील दोन मित्र गंभीर जखमी

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाजवळ असलेल्या पुलावर गुरुवारी सकाळी १०:३० च्या सुमारास एका अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन मित्र गंभीर जखमी झाले असून, धडक देऊन अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

​पुण्यातील राजेंद्रनगर परिसरात राहणारे नितीन बबन खिल्लारे (४०) आणि त्यांचे मित्र हेरंब हरिभाऊ घाणेकर (३५) हे आपल्या बजाज डिस्कव्हर दुचाकीवरून (क्र. एम.एच.१२/के.एम./७९३५) प्रवास करत होते. कळंबणी रुग्णालयापुढील वाळंजवाडीच्या पाठीमागे असलेल्या पुलावर ते पोहोचले असता, पाठीमागून येणाऱ्या एका वेगवान अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

​ही धडक इतकी भीषण होती की, फिर्यादी नितीन खिल्लारे यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. तसेच त्यांचे मित्र हेरंब घाणेकर यांच्या उजव्या पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

​अपघातानंतर जखमींना कोणतीही मदत न करता किंवा पोलिसांना माहिती न देता चालक गाडीसह पळून गेला. याप्रकरणी खेड पोलिसांनी रात्री १०:५० वाजता अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि १८४, १३४(अ)(ब). कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ​खेड पोलीस आता महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.