रत्नागिरी:- गुहागर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बहुचर्चित खून प्रकरणातील संशयित आरोपीविरुद्ध चिपळूण सत्र न्यायालयाने जारी केलेले बिगरजामीनपात्र वॉरंट मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंचने रद्द केले आहे.
नियमित सुनावणीदरम्यान न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे हे वॉरंट काढण्यात आले होते. उच्च न्यायालयाने आरोपीला दिलासा देतानाच, खटल्याच्या विलंबाची भरपाई म्हणून १५ हजार रुपयांचा दंड ठोठावून पुढील सर्व तारखांना नियमित हजर राहण्याची कडक ताकीद दिली आहे.
गुहागर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यामधील भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून) अंतर्गत वसंत कृष्णा पडदळे याच्यावर गुन्हा दाखल आहे. हा खटला सध्या चिपळूण येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सत्र खटला म्हणून चालवला जात आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने वसंत पडदळे यांना ११ मार्च २०२१ रोजी गुणवत्तेवर नियमित जामीन मंजूर केला होता. मात्र, चिपळूण सत्र न्यायालयात तीन सुनावणीदरम्यान सलग तारखांना अनुपस्थित राहिल्याने, न्यायालयाने ६ डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्याविरुद्ध बिगरजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्याच दिवशी आरोपीने हे वॉरंट रद्द करण्यासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता.
सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आरोपीने वकील मोहित दळवी यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अश्विन डी. भोबे यांच्यासमोर सुनावणी झाली.









