चिपळूण:- खेड- चिपळूण महामार्गावर बुधवारी वन विभागाने सापळा रचून खवले मांजराची विक्री करणाऱ्या सहा शिकाऱ्यांना त्यांच्या दोन मोटरसायकलसह ताब्यात घेऊन अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीवरून वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत विशिष्ट संरक्षण मिळालेले दुर्मिळ असे जिवंत खवले मांजर विक्रीसाठी येणार असल्याचे समजले होते त्यानुसार खेड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 साईबा ढाबा खेड रेल्वे स्टेशन जवळ सापळा रचण्यात आला. विक्रीसाठी आल्यावर आणलेल्या पोत्यामध्ये जिवंत खवले मांजर असल्याची खात्री झाल्यावर तात्काळ झटापट करून चार जणांना चार चाकी गाडीमध्येच ताब्यात घेण्यात आले तर इतर दोन जणांना जवळपासच्या भागातून ताब्यात घेण्यात आले. 26 मार्च 21 रोजी अध्यक्ष जिल्हा व्याघ्र कक्ष समिती तथा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मोहित कुमार गर्ग यांनी खवले मांजर तस्करी रोखण्यासाठी वन व पोलिस विभागास समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या होत्या.
सदर कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत शहा व पोलिस विभागाने वनविभागातस मोलाचे सहकार्य केले. आरोपी साठी लावलेल्या सापळ्यात महेश विजय शिंदे (वय 35 राहणार खेड तालुका खेड), उद्धव नाना साठे (वय 38 राहणार ठाणे), अंकुश रामचंद्र मोरे (वय 48 राहणार वरवडे तालुका दापोली), समीर सुभाष मोरे (वय 21 राणा पोखळवणे तालुका), अरुण लक्ष्मण सावंत (वय 52 रा.ठाणे), अभिजीत भार्गव सागावकर (वय 32 रा. सुकवली तालुका खेड) या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींकडून तस्करी करण्यासाठी आणलेले खवले मांजर तसेच गुन्हे कामी वापरण्यात आलेल्या दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.
खवल्या मांजर ही एक दुर्मिळ सस्तन प्राण्यांची प्रजाती आहे. वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत या प्राण्याला वाघा एवढे संरक्षण दिले गेले आहे. जगात वाघाच्या खालोखाल सर्वात जास्त तस्करी या प्राण्याची होते. खवले मांजर हा प्राणी वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत अनुसूची 1 मध्ये येत असून सदर प्राण्याची शिकार करणे, तस्करी करणे किंवा जवळ बाळगणे यासाठी सात वर्षे सक्त कारावास व दहा हजार रुपये दंडाची तरतूद आहे.
या कारवाईमध्ये दिपक खाडे विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण, सचिन निलख सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण, वैभव बोराटे परिक्षेत्र वन अधिकारी दापोली, परिक्षेत्र वन अधिकारी चिपळूण, अ. रा.दळवी वनपाल खेड, रोहन भाटे माजी मानद वन्यजीव रक्षक सातारा हे सहभागी झाले होते. पुढील तपास वनक्षेत्रपाल दापोली वैभव बोराटे हे सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. नागरिकांनी आपल्या आजूबाजूला वन्यजीव शिकार व तस्करी होत असल्यास वनविभागास कळवावे.माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल असे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे.