Tuesday, May 26, 2026
spot_img
Home गुन्हेगारी कोदवली येथे साडेतेरा लाखांच्या गोवा बनावटीच्या दारूसह दोन वाहने जप्त

कोदवली येथे साडेतेरा लाखांच्या गोवा बनावटीच्या दारूसह दोन वाहने जप्त

कणकवलीतील तिघे गजाआड

राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर जवळील कोदवली येथे पोलिसांनी दारूबंदी कायद्यांतर्गत एक मोठी कारवाई केली आहे. कोदवली येथील पहिल्या बस स्टॉप फाट्याजवळ पोलिसांनी सापळा रचून बोलेरो पिकअप आणि इनोव्हा कारमधून बेकायदेशीरपणे वाहतूक केली जाणारी तब्बल १३ लाख ५० हजार २५६ रुपयांची गोवा बनावटीची दारू आणि वाहने जप्त केली आहेत. या प्रकरणी कणकवली येथील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई शुक्रवार, दि. २३ मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कोदवली पहिला बस स्टॉप फाटा येथे करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनिल लक्ष्मण केसकर (बकल नं. ०९, नेमणूक राजापूर पोलीस ठाणे) यांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गु.र.नं. १४६/२० (महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ए), (ई)) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

अमोल लक्ष्मण चिदकर (वय ३५ वर्षे, रा. कलमठ, गावडेवाडी, ता. कणकवली), अमित धोंडू चिंदरकर (वय ३४ वर्षे, रा. गावडेवाडी, कलमठ, ता. कणकवली), प्रशांत प्रकाश पवार (वय २९ वर्षे, रा. कलमठ, गावडेवाडी, ता. कणकवली) या तिघांवर अटकेची कारवाई करण्यात आली.

​पोलीस पथकाने केलेल्या या कारवाईत आरोपींच्या ताब्यातून ​बोलेरो पिकअप गाडी, ​इनोव्हा कार ही चारचाकी वाहने आणि वेगवेगळ्या ब्रँडच्या गोवा बनावटीच्या दारूच्या एकूण ४,६६८ सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. या मुद्देमालाची एकूण किंमत १३,५०,२५६ रुपये आहे.

​कणकवली येथील हे तिन्ही आरोपी कोणत्याही परवान्याशिवाय हा साडेतीन लाखांपेक्षा जास्त किमतीचा दारूसाठा विक्रीच्या उद्देशाने वाहनांमध्ये भरून वाहतूक करत असताना राजापूर पोलिसांच्या जाळ्यात सापडले. या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शनिवारी, दि. २४ मे रोजी मध्यरात्री १:२८ वाजता या गुन्ह्याची अधिकृत नोंद करण्यात आली असून, राजापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.