Wednesday, August 26, 2026
spot_img
Home रत्नागिरी कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; गाड्या ६ ते ७ तास उशिराने

कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; गाड्या ६ ते ७ तास उशिराने

रत्नागिरी:- कोकण पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत झाले असून, गाड्या ६ ते ७ तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सततच्या पावसामुळे रेल्वे गाड्यांचा वेग मंदावला आहे, ज्याचा थेट फटका प्रवाशांच्या नियोजनाला बसत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या वेळेवर पोहोचत नसल्याने स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होत असून, प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

कोकणकन्या एक्स्प्रेस (मुंबई-मडगाव): मंगळवारी ही गाडी तब्बल ७ तास उशिराने सावंतवाडी स्थानकात पोहोचली. बुधवारी देखील कोरे मार्गावर हीच परिस्थिती होती. मांडवी एक्स्प्रेस (सीएसएमटी- मडगाव) ही गाडी नियोजित वेळेपेक्षा ६ तास उशिराने सावंतवाडी स्थानकात दाखल झाली. एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस ही गाडी सुमारे ३ तास उशिराने धावत आहे.दिवा-सावंतवाडी पॅसेंजरसह जनशताब्दी आणि तुतारी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावरही मोठा परिणाम झाला आहे.

रेल्वे प्रशासनाकडून गाड्यांचे पुनर्नियोजन करण्यात येत असले, तरी पावसाचा जोर कायम असल्याने रेल्वे गाड्या वेळेत चालवणे एक मोठे आव्हान ठरत आहे. पावसामुळे रेल्वे मार्गावरील सुरक्षिततेची खबरदारी घेत गाड्यांचा वेग मर्यादित ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे गाड्यांच्या उशिराच्या वेळेत भर पडत आहे. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत ॲप किंवा चौकशी क्रमांकावरून आपल्या गाडीची सद्यस्थिती तपासून घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.