रत्नागिरी:- कोकणातील आरोग्य व्यवस्थेचा कणा ठरणार्या रत्नागिरी येथील नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांच्या संलग्न रुग्णालयाच्या उभारणीसाठी राज्य शासनाने ५३ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. प्रकल्पाचे नकाशे आणि आराखडे अधिक अद्ययावत व सुधारित करण्यात आल्यामुळे हा वाढीव खर्च मंजूर करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने या सुधारित अंदाजपत्रकाला अधिकृत प्रशासकीय मान्यता दिली असून, आता या संपूर्ण भव्य प्रकल्पाचा एकूण खर्च ४७६.९७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
पूर्वी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ४२३.९७ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्यापूर्वीच प्रशासकीय पातळीवर आराखडे सुधारित करण्यात आले. बांधकाम क्षेत्र आणि सुविधांचा विस्तार झाल्याने खर्चात वाढ झाली होती. हा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीसमोर ठेवण्यात आला असता, २१ मे, २०२६ रोजी झालेल्या बैठकीत समितीने या अतिरिक्त ५३ कोटी रुपयांच्या वाढीव निधीला हिरवा कंदील दाखवला. त्यानुसार ७ जुलै, २०२६ रोजी सुधारित वित्तीय मंजुरीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
या सुधारित निधीमुळे आता रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय, ४३० खाटांचे सर्वसोयींनी युक्त रुग्णालय, मुला-मुलींची सुसज्ज वसतिगृहे आणि कर्मचारी निवासस्थाने यांसारख्या भव्य वास्तूंचा मार्ग अधिक प्रशस्त झाला आहे. या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय संस्था ‘जायका’ अंतर्गत निधी उपलब्ध होणार असून, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली दर्जेदार व पारदर्शक पद्धतीने हे काम पूर्ण केले जाणार आहे. या अतिरिक्त निधीच्या मंजुरीमुळे प्रकल्पाचे काम आता अधिक गतीने आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यास मदत होणार असल्याने रत्नागिरीकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.









