रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव येथील रेल्वे स्टेशन समोर मंगळवारी रात्री एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या एका मोटरसायकल स्वाराने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शिवशाही बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कुवारबाव रेल्वे स्टेशन परिसरातील मुख्य रस्त्यावर एक शिवशाही बस उभी होती. याच दरम्यान एक तरुण आपल्या मोटरसायकलवरून अत्यंत वेगाने येत होता. वेगावर नियंत्रण न राहिल्याने त्याची दुचाकी थेट उभ्या असलेल्या शिवशाही बसच्या पाठीमागच्या भागावर आदळली.
हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसल्यानंतर मोटरसायकल बसच्या खालच्या भागात अडकली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दुचाकीचा वेग अंदाजे १२० किमी प्रति तास इतका होता. धडक बसताच दुचाकीस्वाराचे तोंड बसवर जोरात आदळल्याने तो रक्तबंबाळ झाला आणि गंभीर जखमी झाला.
“दुचाकीचा वेग प्रचंड होता, समोर बस उभी असल्याचे कदाचित त्या स्वाराच्या लक्षात आले नसावे. क्षणात मोठा आवाज झाला आणि तो बसखाली फेकला गेला,” असे तेथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी सांगितले.
अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमी तरुणाला तातडीने रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर इजा झाली असून, त्याला अधिक उपचारांची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रात्रीच्या वेळी अतिवेगाने वाहन चालवणे किती धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









