किरकोळ कारणावरून वृद्धाला मारहाण

भांबेड कुडेवाडी येथील घटना

लांजा:- गावातील जांगल देवाचे जुने मंदिर पाडून नवीन मंदिर बांधण्याकरिता गावाचे सांगण्यावरून नारळ ठेवला या कारणावरून ६३ वर्षीय वृद्धाला लाथा बुक्क्याने, मारहाण, शिवीगाळ तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना भांबेड कुडेवाडी येथे बुधवारी रात्री १० वाजता घडली असून प्रकरणी येथील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची फिर्याद भांबेड कुडेवाडी येथील सुभाष शामकांत मोरे (वय ६३) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे. भांबेड कुडेवाडी येथे जांगल देवाचे जुने मंदिर आहे. हे जुने मंदिर पाडून त्या जागी नवीन मंदिर बांधण्याकरिता गावाच्या सांगण्यावरून सुभाष शामकांत मोरे यांनी नारळ ठेवला होता. या कारणावरून श्रीधर शंकर मोरे (वय ८०), तुळशीराम शंकर मोरे (वय ७२), तेजस तुळशीराम मोरे (वय ३५), श्रध्देश तुळशीराम मोरे उर्फ बारक्या (वय ३२), आणि गणेश जयराम मोरे (वय ५५ सर्व राहणार भांबेड कुडेवाडी )यांनी बुधवार दिनांक ११ मार्च रोजी रात्री १०.१५ वाजण्याच्या दरम्याने सुभाष शामकांत मोरे यांच्या घरी जाऊन, बेकायदा जमाव करून, दंगा करून, शिवीगाळ करून, हाताच्या थोपटाने तसेच लाथाबुक्याने त्यांना मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. यामध्ये त्यांच्या उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत केली.

या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी वरील पाचही जणांनी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५२, ३५१(२) याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश आखाडे हे करत आहेत