चिपळूण:- जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून अनुदानावर कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिलेने अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकारानंतर त्या महिलेला पोलिसांनी अटक केली होती. असे असतानाच तिचा पती आबुबकर सय्यद (शिरगाव) याला अटक केली असून त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
तालुक्यातील शिरगाव येथील एका महिलेने भोम येथील रोहिणी चव्हाण यांना जिल्हा उद्योग केंद्र योजनेंतर्गत कर्ज काढून देते, असे सांगून १० लाख रुपयांचे कर्ज काढण्यासाठी ५० हजार रुपये घेतले होते. मात्र कोणत्याही प्रकाराचे कर्ज न देता शिवाय घेतलेले ५० हजार रुपयेही त्या महिलेने परत दिले नाहीत. हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या महिलेला पोलिसानी अटक केली. पोलीस कोठडी संपताच पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्या महिलेला न्यायालयीन कोठडी प्राप्त झाली. असे असताना या कर्ज फसवणूकप्रकरणी त्या महिलेचा पती आबुबकर सय्यद यालाही अटक करण्यात आली असून त्याला ४ दिवसाची पोलीस कोठडी प्राप्त झाली आहे.