Thursday, August 27, 2026
spot_img
Home गुन्हेगारी कन्स्ट्रक्शन कंपनीतील कर्मचाऱ्यानेच ५७ हजार रुपये केले लंपास

कन्स्ट्रक्शन कंपनीतील कर्मचाऱ्यानेच ५७ हजार रुपये केले लंपास

मंडणगड:- तालुक्यातील धुत्रोली येथील ‘अक्षय कन्स्ट्रक्शन’ कंपनीत चोरीची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कंपनीच्या ऑफिसमधील टेबलच्या ड्रॉवरमध्ये किरकोळ खर्चासाठी ठेवलेले ५७ हजार रुपये रोख एका कर्मचाऱ्यानेच लबाडीच्या इराद्याने चोरून नेले आहेत. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात कंपनीचे कर्मचारी सुनील बसान्ना गुत्तेदार (वय २७, रा. धुत्रोली, ता. मंडणगड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मनिषकुमार चंचल (सध्या रा. धुत्रोली, मूळ रा. सराय पकवान) याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धुत्रोली येथील अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या क्रेशर डिपार्टमेंटच्या दैनंदिन किरकोळ खर्चासाठी फिर्यादी सुनील गुत्तेदार यांच्याकडे ५७,००० रुपये रोख रक्कम होती. सुनील यांनी हे पैसे ऑफिसमधील क्रेशर डिपार्टमेंटच्या रूममध्ये असलेल्या एका टेबलच्या ड्रॉवरमध्ये सुरक्षित ठेवले होते.

शनिवार, १६ मे रोजी रात्री ११ वाजेपासून ते रविवार, १७ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान, ऑफिसमध्ये कोणी नसताना आरोपी मनिषकुमार चंचल याने स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने ड्रॉवर उघडून त्यातील ५७,००० रुपये रोख चोरून नेले. पैसे गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुनील यांनी कंपनीत चौकशी केली असता मनिषकुमारने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

​पैसे चोरीला गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुनील गुत्तेदार यांनी १८ मे रोजी मंडणगड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार १८ मे रोजी रात्री ११:२३ वाजता गुन्हा रजिस्टर नंबर ५५/२०२६ अन्वये नवीन भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०६ (चोरी) प्रमाणे आरोपी मनिषकुमार चंचल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडणगड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.