खेड:- परशुराम घाटात कंटेनर चालकासह क्लिनरला 15 जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केल्याची घटना 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. या मारहाणीत कंटेनर चालक व क्लिनर जखमी झाले. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष मुकुंदराव नलावडे (पीरलोटे, खेड, मूळ फलटण, सातारा), जितेंद्र जयराम सुर्वे (कापसाळ, चिपळूण), व इतर 12 ते 13 जणांनी मारहाण केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर चालक गणेश कावरे हा आपल्या ताब्यातील कंटेनरमधून मच्छि घेवून कुलाबा ते रत्नागिरी असा जात होता. यावेळी परशुराम घाटातील कमानीच्या इथे त्याला ब्रेक न लागल्याने हुंडाई आय 10 आणि मारुती सुझुकी यांच्यावर आदळला. या अपघातात गाडयांचे नुकसान झाले. दोन्ही गाडी चालकांनी पैशाची मागणी केली. यावेळी चालकाने गाडीच्या इन्शुरन्सकडून करुन घ्या अशी विनंती केली. यावेळी राग अनावर झाल्याने दोन्ही वाहन चालकांनी कंटेनर चालक व त्याच्यासोबत असलेल्या क्लिनरला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याबरोबर अपघातग्रस्त दोन गाडयांमधील 12 ते 13 जणांनी येउन जमाव करुन लाथाबुक्यांनी जोरदार मारहाण केली. तसेच गाडी पेटवून देण्याची धमकी दिली. दमदाटी व शिवीगाळ करुन दोघांना जबर मारहाण केली. या मारहाणीत दोघेही जखमी झाले. याप्रकरणी कंटेनर चालकाने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार 15 जणांवर भादविकलम 143, 147, 149, 323, 504, 506, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसर्या बाजूने हुंडाई आय 10 या गाडीचे मालक सुभाष नलावडे यांनी खेड पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, कंटेनर चालकाने हुंडाई आय 10 या गाडीला पाठीमागून धडक दिल्याने पत्नी व मुलगा जखमी झाले. तसेच मारुती सुझुकी या वाहनासही धडक दिल्याने कार चालक जितेंद्र जयराम सुर्वे यांना मुका मारला लागला.
या अपघातात तीन जणांच्या दुखापतीस व दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालक गणेश कावरे याच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात भादविकलम 279, 337, मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









