ओमिक्रॉन विषाणूचा धोका! आरोग्य यंत्रणा अलर्ट

रत्नागिरी:- कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या ओमिक्रॉन या विषाणूमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हयात कोविड लसीकरणला गती देण्यात येत आहे. ओमिक्रॉनचा एकही रुग्ण जिल्ह्यात आढळलेला नाही. तरीही नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी बी. एन. पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत.

कोरोना संसर्ग काळात नियमित मास्क वापरणे, वारंवार हात धुणे व शारिरीक अंतर ठेवणे (फिजिकल डिस्टंसिंग) याची अंमलबजावणी आवश्यक आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर कोविड लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. जिल्ह्यात सध्या दररोज एक आकडी कोविड बाधित सापडत आहेत. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोविड लसीकरण फार महत्वाचे आहे. नागरिकांनी कोविड लस घेण्यासाठी प्रशासनाने आवाहन केले आहे. आतापर्यंत जिल्हयात कोविड लसीची पहिली मात्रा 9 लाख 48 हजार 752 आणि दुसरी मात्रा 4 लाख 54 हजार 940 जणांनी घेतली आहे. लसींच्या 14 लाख 03 हजार 692 मात्रा नागरिकांना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर लसीकरणाने हा प्रतिबंधात्मक उपाय आहे. नागरिकांनी लसीकरणात 100 टक्के लाभार्थ्यांचा पहिला डोस पूर्ण होईल याकडे लक्ष देण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांचा दुसरा डोस राहिला आहे, तो प्राधान्याने पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये यांनी केले आहे.