Monday, July 20, 2026
spot_img
Home लांजा एसटी बसची रिक्षाला धडक, तिघेजण जखमी

एसटी बसची रिक्षाला धडक, तिघेजण जखमी

लांजा:-  एसटी बसने रिक्षाला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये रिक्षा चालकासह तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास लांजा कोर्ले मार्गावर केळंबे तेलीवाडी येथे झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा वैभव वसाहत येथील पारितोष प्रशांत वाघधरे (वय ३६) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. शनिवारी सकाळी त्यांचे वडील प्रशांत नारायण वाघधरे (वय ६५, राहणार वैभव वसाहत लांजा) हे आपल्या ताब्यातील रिक्षा (क्रमांक एम एच ०८-ए क्यू-१८९०) घेऊन पत्नी सौ पल्लवी प्रशांत वाघधरे (वय ६०) आणि नातू पार्थ पारितोष वाघधरे यांच्यासह लांजा ते विवली असा प्रवास करत असताना केळंबे विवली तेलीवाडी येथील विभूते स्टॉप जवळ समोरून आलेल्या एसटी बस ( क्रमांक एम एच ०८-बीटी-२६६७) ने रिक्षाला समोरासमोर जोरदार धडक दिली.

या अपघातामध्ये रिक्षा चालक प्रशांत वाघधरे, सौ पल्लवी वाघधरे हे दोघे गंभीर जखमी झाले. नातू पार्थ वाघधरे हा देखील जखमी झाला. या अपघाताची लांजा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे हे करत आहेत.