खेड:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून खेड तालुक्यातील उधळे येथे एक भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. महामार्गावरील उधळे येथील दीपक हॉटेलसमोर बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि रिक्षा यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात एक दुचाकीस्वार तरुण गंभीररीत्या जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याच्या दिशेने एक मोटारसायकल (क्रमांक: टीएन ३७ इवाय ८३७५) जात होती. ही दुचाकी उधळे गावाच्या हद्दीत दीपक हॉटेलसमोर आली असता, पुढे खेडच्या दिशेनेच जात असलेल्या एका रिक्षाला (क्रमांकः एमएच ०८ बीसी ४१८९) तिने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार रस्त्यावर फेकल्या जाऊन गंभीर जखमी झाला. या धडकेत वाहनांचेही नुकसान झाले आहे. या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव रणजीत राम कुमार (वय २३ वर्ष) असे आहे. अपघाताची भीषणता पाहून स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी तातडीने धाव घेतली.
अपघाताची माहिती मिळताच नाणीजधाम जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज संस्थानची रुग्णवाहिका घटनास्थळी तात्काळ दाखल झाली. संस्थानच्या मदतकार्यामुळे जखमी रणजीत राम कुमार याला तात्काळ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.









