विक्रीच्या उद्देशाने गांजाचा साठा ; ८० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी:- शहरातील उद्यमनगर परिसरात विक्रीच्या उद्देशाने गांजाचा साठा बाळगणाऱ्या २७ वर्षीय तरुणाला रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. साहिल समीर सोलकर (वय २७, रा. मराठी शाळेजवळ, कोकणनगर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून एकूण १ किलो २९१ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून, गांजासह अन्य साहित्य असा एकूण ८० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ४.३३ वाजण्याच्या सुमारास शहरातील काझी चाळ, उद्यमनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. संशयित साहिल सोलकर याच्याकडे गांजासदृश अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या असल्याची बाब निदर्शनास आली. त्यानंतर पोलिसांनी तपासणी केली असता त्याच्याकडे गांजाचे दोन साठे आढळून आले.
यामध्ये खाकी रंगाच्या चिकट पट्टीने गुंडाळलेल्या पुडीमध्ये ९१० ग्रॅम निव्वळ वजनाचा गांजा आढळला. या गांजाची किंमत ६० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच निळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीमध्ये ३८१ ग्रॅम निव्वळ वजनाचा गांजा मिळून आला. त्याची किंमत २० हजार रुपये आहे. अशा प्रकारे दोन्ही ठिकाणचा मिळून एक किलो २९१ ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला. याशिवाय गांजा ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली काळ्या रंगाची प्रवासी बॅगही जप्त करण्यात आली असून, तिची किंमत १०० रुपये आहे. त्यामुळे एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ८० हजार १०० रुपये इतकी आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई राजेश भास्करराव भुजबळराव (वय ५५) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित साहिल सोलकर याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६३/२०२६ अन्वये अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) १९८५ च्या कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ नोव्हेंबर रोजी रात्री १०.५७ वाजता या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
शहरातील वर्दळीच्या परिसरात गांजाचा साठा विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचे उघड झाल्याने अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.









