मुंबई-गोवा महामार्गावरील धामणदेवी येथील घटना
खेड:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणदेवी येथे एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. चारचाकी गाडीला धडक दिल्यानंतर, जाब विचारणाऱ्या पुण्याच्या एका ज्येष्ठ नागरिकाला दुचाकीस्वाराने चक्क कानाखाली मारून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील धनकवडी येथील रहिवासी महादेव अनंतराव टिंगरे (५२) हे लोटे एम.आय.डी.सी. मधील काम संपवून आपल्या होंडा सिटी कारने (MH 12 AV 7662) जेवणासाठी धामणदेवी येथील ‘ओमेगा इन’ हॉटेलमध्ये जात होते. दुपारी १:५९ च्या सुमारास ते हॉटेलच्या पार्किंगमध्ये गाडी लावत असताना, पाठीमागून येणाऱ्या कावासाकी वर्सेस १००० या स्पोर्ट्स बाईकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.
दुचाकीस्वार अजय प्रदीपकुमार शर्मा (३०, रा. कामोठे, पनवेल) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे गाडी चालवल्याने हा अपघात झाला. मात्र, अपघात घडल्यानंतर महादेव टिंगरे हे गाडीतून खाली उतरत असताना, आरोपी अजय शर्मा याने त्यांना कोणतीही विचारपूस न करता थेट कानाखाली मारली आणि शारीरिक इजा पोहोचवली.
याप्रकरणी महादेव टिंगरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी आरोपी अजय शर्मा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, ११५(२) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. महामार्गावरील हॉटेलच्या आवारातच घडलेल्या या वादावादीमुळे आणि मारहाणीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.









