Friday, June 19, 2026
spot_img
Home गुन्हेगारी १३ लाखाची फसवणूकप्रकरणी व्यावसायिक निर्दोष

१३ लाखाची फसवणूकप्रकरणी व्यावसायिक निर्दोष

गुहागर:- तालुक्यातील कुडगिरीमधील आंबोकर कुटुंबियांनी आपल्या जुन्या घराठिकाणी नवीन घर बांधण्यासाठी पेवे येथील मुश्ताक खान सरगुरो यांना ठेका दिला होता. मात्र याप्रकरणी निर्माण झालेल्या वादातून मुश्ताक खान सरगुरो यांच्यावर १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. फसवणुकीच्या या गुन्ह्यातून गुहागर न्यायालयाने ठेकेदार खान निर्दोष मुक्तता केली आहे.

तालुक्यातील कुडगिरी येथील आंबोकर कुटुंबियांनी २०१४ मध्ये त्यांच्या जुन्या घराठिकाणी नवीन घर बांधण्यासाठी बांधकाम व्यावसायिक मुश्ताक खान सरगुरो यांना ठेका दिला होता. यासाठी ८ लाख इतकी रक्कम ठरवण्यात आली. त्यानंतर घराचे जुने वापरते सामान याची किंमत ४ लाख ६५ हजार इतकी ठरवण्यात आली. एकूण १३ लाख इतक्या किंमतीमध्ये घर बांधून देण्याचे सरगुरो यांनी कबूल केले होते आणि तसा करारही दोघांच्या मध्ये करण्यात आला होता. मात्र २०१४ ते २०१९ या काळामध्ये ठेकेदाराने घराचे बांधकाम न करता ते अपूर्ण अवस्थेत ठेवले. पाच वर्षाच्या काळात वारंवार पाठपुरावा करून देखील घर बांधून पूर्ण झाले नाही. यामुळे आंबोकर कुटुंबियांनी २०१९ मध्ये गुहागर पोलीस ठाण्यात सरगुरो यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या दाव्याच्या सुनावणी दरम्यान ठेकेदार सरगुरो यांच्यावतीने ॲड. संकेत साळवी यांनी कामकाज पाहिले. ॲड. साळवी यांना ॲड. अलंकार विखारे, ॲड. सुप्रिया वाघधरे, ॲड. मानसी सोमण आणि ॲड. रोशनी पवार यांनी सहकार्य केले.