अडखळ येथील दुर्घटना; खडी उतरवून परतताना काळाचा घाला
दापोली:- तालुक्यातील अडखळ बौद्धवाडी येथे गुरुवारी पहाटे डंपरला झालेल्या भीषण अपघातात ३० वर्षीय डंपर चालक नवनीत भिसे (केळशी) यांचा मृत्यू झाला. खडी उतरवून केळशीकडे परतत असताना रस्त्याची साईडपट्टी खचल्याने डंपर मातीत रुतला. डंपर बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना डंपर उजव्या बाजूला उलटून चालक भिसे त्याखाली दबला गेला आणि गंभीर जखमीझाला. त्याला दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तपासणीअंती मृत घोषित करण्यात आले.
भिसे आयशर डंपरमधून खडी वाहतूक करण्याचे काम करत होता. गुरुवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास अडखळ परिसरात खडी रिकामी करून तो केळशीच्या दिशेने परतत होता. अडखळ बौद्धवाडी परिसरातून जात असताना साईडपट्टी खचल्याने डंपरचा मागील भाग मातीत रुतला.
वाहन बाहेर काढण्यासाठी भिसे डंपरमधून खाली उतरला. परंतु, वाहनाची पाहणी सुरू असतानाच अचानक माती आणखी खचली आणि डंपरचा तोल जाऊन तो उजव्या बाजूला उलटला. डंपर थेट त्यांच्या अंगावर पडल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर क्लिनरने तातडीने डंपरचे मालक मिथुन प्रकाश चिंचघरकर यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने चालकाला डंपरखालून बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पहाटे साडेचारच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या दुर्घटनेमुळे केळशी आणि अडखळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भिसे हा मेहनती व कर्तव्यदक्ष चालक म्हणून परिचित होता. त्याच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.









