दापोली:- दापोली तालुक्यातील लाडघर येथील एका हॉटेलच्या जिन्यावरून पडून एका ३४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सद्दाम यासीन मुरुडकर (वय ३४, रा. टांगर, ता. दापोली) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे टांगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास ही घटना घडली. लाडघर येथील ‘नौका बीच’ हॉटेलमध्ये सद्दाम मुरुडकर हे जिन्यावरून अचानक खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या घटनेची माहिती शशिकांत बागुल यांनी सद्दामचे चुलत भाऊ इरफान जमाल मुरुडकर यांना फोनवरून दिली. माहिती मिळताच इरफान, त्यांचा भाऊ निसार आणि गावातील इतर नातेवाईकांनी तातडीने हॉटेलकडे धाव घेतली.
घटनास्थळी पोलीस अधिकारी आणि नातेवाईकांनी जखमी सद्दामला रुग्णवाहिकेने तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी अंती दुपारी १ वाजता सद्दाम मुरुडकर यांना ‘मृत’ घोषित केले.
याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक २३/२०२६ नुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. इरफान जमाल मुरुडकर यांनी यासंदर्भात फिर्याद/खबर दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.









