एसटी चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- आबलोली ते जाकादेवी मार्गावर मांजरे बुडबुड्याचे पाणी (ता. संगमेश्वर) येथे एसटी बस आणि ॲक्टिव्हा दुचाकीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात बाप-लेक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी, २८ ऑगस्ट रोजी दुपारी १:१५ वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात एसटी बस चालकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राई रांजेवाडी (ता. जि. रत्नागिरी) येथील रहिवासी विघ्नेश अनंत चव्हाण (वय १८) हा आपल्या ताब्यातील ॲक्टिव्हा मोटरसायकल (क्र. MH 46 BG 8149) वरून वडील अनंत तुकाराम चव्हाण (वय ६०) आणि आई रुपाली अनंत चव्हाण (वय ५६) यांना सोबत घेऊन राई येथून काजुर्लीच्या दिशेने जात होता.
हे कुटुंब आबलोली-जाकादेवी रस्त्यावरील मांजरे बुडबुड्याचे पाणी या ठिकाणी पोहचले असता, समोरून येणाऱ्या एसटी बसच्या (क्र. MH 40 N 9870) चालकाने आपल्या ताब्यातील गाडी अत्यंत अविचाराने, अतिवेगाने आणि हयगयीने चालवत रस्त्याच्या चुकीच्या (उजव्या) बाजूला आणली. भरधाव एसटीने ॲक्टिव्हा दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला असून, एसटी आणि दुचाकी या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात दुचाकी चालक विघ्नेश चव्हाण आणि मागे बसलेले त्याचे वडील अनंत चव्हाण हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जखमींना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
या घटनेप्रकरणी काजुर्ली मळेवाडी (ता. गुहागर) येथील रहिवासी प्रमोद अशोक जगताप (वय ४३) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी एसटी चालक आरोपी पुंडलीक शिवाजी केंद्रे (वय ३५, रा. केंद्रेवाडी ता. अहमदपूर जि. लातूर, सध्या रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) याच्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









