शाळकरी मुलींची छेड काढणार्‍या सरकारी कर्मचाऱ्याला बेड्या

संगमेश्वर मठधामापूर परिसरातील घटना

संगमेश्वर:- तालुक्यातील मठधामापूर परिसरात संगणक वर्गासाठी जाणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थिनींचा पाठलाग करून, त्यांच्यासमोर अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी देवरुख पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संशयित आरोपी हर्षल सुभाष गवंडी (वय २६, रा. पाटगाव) याला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, संशयित आरोपी हा संगमेश्वर पंचायत समितीमध्ये लिपिक पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल रोजी सकाळी ९:३० ते १०:०० च्या सुमारास ही घटना घडली. पीडित विद्यार्थिनी देवरुख येथील संगणक वर्ग संपवून एस.टी. बसने ताम्हाणे फाटा येथे उतरल्या होत्या. तेथून त्या पायी मठधामापूर गुरववाडीकडे जात असताना, पिवळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या आरोपीने त्यांचा पाठलाग सुरू केला.

मठधामापूर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आरोपीने आपली दुचाकी थांबवून आधी विद्यार्थिनींची टेहळणी केली. त्यानंतर काही अंतरावर पुन्हा विद्यार्थिनींच्या जवळ जाऊन चालत्या दुचाकीवर उभे राहून अश्लील कृत्य केले. या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता.

या घटनेमुळे भयभीत झालेल्या विद्यार्थिनींनी घरी जाऊन पालकांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी धीर देत २ एप्रिल रोजी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७८, ७९ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपी सरकारी कर्मचारी असल्याने या घटनेची परिसरात तीव्र चर्चा असून, महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.