देवरुख:- शहरातील सोन्याचे व्यापारी केतकर अपहरण प्रकरणाला पोलिसांनी गती दिली आहे. आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपहरण प्रकरणात वापरण्यात आलेली पीस्टल बंदुक मुचकुंदी नदीतून शनिवारी दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतली.
सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर हे १७ सप्टेंबर रोजी साखरप्याहून देवरुखच्या दिशेने येत असताना वांझोळेदरम्यान त्यांचे अपहरण झाले होते. अज्ञातांनी त्यांच्याकडील रोख रक्कम, सोन्याचे दागिने लंपास केले होते. केतकर यांना इर्टिगा गाडीत कोंबून चेहऱ्यावर बुरखा घालून रातोरात वाटूळ येथे सोडले होते. याची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधीक्षक सुरेश कदम, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा रत्नाागिरी, देवरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
काही दिवसांतच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. ८ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणातील सागर कदम (रा. हातखंबा) याने जामीन मिळावा, यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला. २० रोजी सागर कदम हा देवरुख पोलिसांना शरण आला. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायाधीशांनी २८ रोजीपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली.
शुक्रवारी सागरची कसून चौकशी केली असता त्याने अपहरणात वापरलेली बंदुक लांजा तालुक्यातील वाटूळमधील मुचकुंदी नदीत टाकल्याचे सांगितले. यानुसार शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास उपविभागीय पोलीस अधीक्षक सुरेश कदम, निरीक्षक उदय झावरे हे सहकाऱ्यांसह मुचकुंदी नदी येथे दाखल झाले. नदीला पाणी असल्याने बंदुकीचा शोध घेणे, हे पोलिसांसमोर आव्हान होते. देवरुख येथील देवानंद गजबार व संजय गजबार यांनी थेट नदीपात्रात उडी घेत बंदुकीचा शोध सुरू केला. २ तासाच्या अथक मोहिमेनंतर गाळात रूतलेली बंदुक शोधण्यात गजबार यांना यश आले. घटनास्थळी पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत मसुरकर, सचिन कामेरकर, सचिन पवार, सुहास लाड, फॉरेन्सीक लॅबची टीम होती. सागर कदम, प्रणित दुधाणे व राजेश नवाले यांनी पैसे काढून ही बंदुक नांदेड येथून खरेदी केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक सुरेश कदम यांनी दिली. पुढील तपासात यातील सत्य उघड होणार आहे. बंदुक शोधण्यात पोलिसांना सहकार्य करणाऱ्या देवानंद गजबार व संजय गजबार यांचा उपविभागीय पोलीस अधीक्षक सुरेश कदम, पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या हस्ते देवरुख पोलीस ठाण्यात सत्कार करण्यात आला.









