चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील खांदाटपाली (भवडवाडी) येथे लोखंडी तारेचा शॉक लागल्याने घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनाप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना दिनांक २८ जुलै २०२६ रोजी सकाळी घडली.
दिनांक २८ जुलै रोजी सकाळी मयत अक्षयची आई चंद्रकला या घराच्या पडवीत वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी गेल्या होत्या. तिथे त्यांना वीजेच्या लोखंडी तारेचा तीव्र शॉक लागल्याने त्यांनी आरडाओरडा केला. आईचा आवाज ऐकून अक्षय चंद्रकांत मेंगे (वय ३१ वर्षे रा. खांदाटपाली, भवडवाडी, ता. चिपळूण) हा तातडीने घराच्या पडवीत धावला. तिथे त्याची आई जमिनीवर खाली पडलेली त्याला दिसली.
आईला वाचवण्यासाठी गेलेल्या अक्षयलाही त्याच लोखंडी तारेचा शॉक लागल्याने तोही जमिनीवर कोसळला आणि ओरडला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर खबर देणार संजय बाबू भुवड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अक्षयचा श्वास सुरू असल्याचे दिसून आल्याने त्यास तातडीने सकाळी ८:३० वाजता चिपळूण येथील ‘लाईफ केअर हॉस्पिटल’मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून उपचारापूर्वीच सकाळी ९:०५ वाजता अक्षय मेंगे यास मृत घोषित केले.
याप्रकरणी लाईफ केअर हॉस्पिटलच्या वारसाच्या माहितीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४९/२०२६ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता – बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.









