विनाकारण शिवीगाळ केल्याने राग अनावर

निवेंडीतील खून; मुलाला अटक, वडिलांना दांडक्याने मारहाण

रत्नागिरी:- बाबा, तुम्ही दारू प्यायला आहात. विनाकारण शिवीगाळ करू नका शांत बसा, असे राजेश कदम वडील सुरेश कदम यांना समजावून सांगत होता. परंतु काही केले तरी वडील एकत नव्हते. हे घर माझे आहे, तू घरातून चालता हो, असे वडील राजेशला वारंवार सुनावत होते. अखेर राजेशचे रागावर नियंत्रण राहिले नाही आणि त्याने वडिलांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.

तालुक्यातील निवेंडी येथे मध्यरात्री हा प्रकार घडला होता. सुरेश नावजी कदम (वय 58, रा. निवेंडी) असे मृत वडिलांचे नाव आहे. त्याला मारहाण करणाऱ्या संशयित मुलाचे नाव राजेश सुरेश कदम (वय 38) असे आहे. जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला पोलिसांनी लगेच अटक केली. तालुक्यातील वरची निवेंडी समतानगर येथे सुरेश कदम हे आपला मुलगा रोजश व मुलगी सुषमा असे एकत्रित राहतात. बाप-लेकामध्ये वारंवार घरगुती कारणावरून वाद होत होते. गुरुवारी (ता. १२) रात्री वडील सुरेश कदम दारू पिऊन आल्यानंतर त्यांनी मुलगा राजेशशी वाद घालायला सुरवात केली. विनाकारण शिवीगाळ करत हे घर माझे आहे, घरातून चालता हो, अशी धमकी देऊ लागले. राजेशने बऱ्याचदा वडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु ते एकतच नव्हते, राग अनावर झाल्याने त्याने वडिलांना दांडक्याने बेदम मारहाण केली. उशिरा चुलत भाऊ विनेश कदम याने घरी जाऊन पाहिले असता सुरेश कदम बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसले. त्यांना अनेक ठिकाणी गंभीर दुखापती झाल्या होत्या. त्यांना खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. राजेशवर जयगड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.