चिपळूण:- गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ८३ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह बहादूरशेख नाका पुलाजवळ वाशिष्टी नदीच्या पात्रात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. लक्ष्मी सिताराम झुजम (वय ८३ वर्षे, रा. पिंपळी बुद्रुक कुंभारवाडी, ता. चिपळूण) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी झुजम या बुधवार, १३ मे रोजी पिंपळी बुद्रुक कुंभारवाडी येथील आपल्या राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाल्या होत्या. कुटुंबियांकडून त्यांचा शोध सुरू असतानाच, दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवार, १४ मे रोजी सायंकाळी ५:४५ वाजण्याच्या सुमारास चिपळूण येथील बहादूरशेख नाका पुलाजवळ वाशिष्टी नदीच्या पात्रात एक मृतदेह तरंगताना आढळून आला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो बेपत्ता लक्ष्मी झुजम यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.
या घटनेची प्राथमिक नोंद झाल्यानंतर संबंधित कागदपत्रे आणि पोलीस ठाणे जा.क्र. ४९२१/२०२६ अन्वयेचा रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर, शनिवारी रात्री ९:५१ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात रीतसर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू (आमृ. क्रमांक ११/२०२६) म्हणून गुन्हा दाखल केला असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.









