Wednesday, May 20, 2026
spot_img
Home गुन्हेगारी वहाळमध्ये बैठकीतील ‘व्हाईस रेकॉर्डिंग’वरून तरुणाला मारहाण

वहाळमध्ये बैठकीतील ‘व्हाईस रेकॉर्डिंग’वरून तरुणाला मारहाण

चिपळूण:- तालुक्यातील मौजे वहाळ कुंभारवाडी येथे एका खाजगी बैठकीदरम्यान मोबाईलमध्ये ‘व्हाईस रेकॉर्डिंग’ केल्याच्या कारणावरून जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. या वादातून एका २९ वर्षीय तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली असून, त्याचे ३० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून घेण्यात आले आहेत. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात धिरज दिलीप कुंभार (वय २९, सध्या रा. वहाळ कुंभारवाडी, मुळ रा. वडाळा ईस्ट, मुंबई) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

​पोलिसांनी कुंभारवाडी येथील रहिवासी असलेल्या भगवान मांडवकर, अभिजित मांडवकर, प्रकाश शिरकर, संतोष भैरवकर, महेंद्र कुंभार या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

​पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी धिरज कुंभार हे दिलीप मांडवकर यांच्या घरी आयोजित एका बैठकीसाठी हजर होते. या मिटिंगचे कामकाज सुरू असताना, धिरज हे आपल्या ओपो कंपनीच्या मोबाईलमध्ये मिटिंगचे ‘व्हाईस रेकॉर्डिंग’ करत असल्याचा संशय उपस्थितांना आला.
​यावरून चिडून जाऊन आरोपी भगवान मांडवकर याने “मला मोबाईल चेक करायचा आहे,” असे सांगत धिरज यांच्याकडील दोन्ही मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि ते परत करण्यास नकार दिला.

मोबाईल हिसकावल्यानंतर आरोपी क्र. १ ते ४ यांनी धिरज कुंभार यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, “तुझा मामेभाऊ दिनेश वहाळकर याला आताच्या आता इथे घेऊन या, त्याशिवाय आम्ही तुम्हांला सोडणार नाही. पुढे काय होईल त्याला तुम्हीच जबाबदार राहाल,” अशी धमकी दिली. तसेच दिनेश वहाळकर याला उद्या मिटिंगला हजर करा, तुम्हीच मिटिंग लावा, अन्यथा “तुझ्या भावाचीही धिंड काढू,” अशी धमकी साक्षीदारांसमोर देण्यात आली. या दरम्यान आरोपी क्र. ५ महेंद्र कुंभार याने फोनवरून “तू जर मिटिंगला आला नाहीस, तर तुला वाडीत घेणार नाही आणि गावालाही येऊ देणार नाही,” अशी धमकी धिरज यांना दिली.

आरोपींनी फिर्यादीकडून एकूण ३०,००० रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन हिसकावून घेतले आहेत. यामध्ये १५,००० रुपये किमतीचा व्हीवो कंपनीचा इ 30 मॉडेलचा मोबाईल, १५,००० रुपये किमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल या मोबाईलचा समावेश आहे.

​या धक्कादायक घटनेनंतर धिरज कुंभार यांनी १८ मे रोजी दुपारी चिपळूण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी १८ मे रोजी दुपारी ४ वाजता गुन्हा रजिस्टर नंबर ५३/२०२६ अन्वये नवीन भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०४(२) (जबरदस्तीने चोरी करणे), ११५(२), ३५१(२) आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. चिपळूण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.