Friday, May 15, 2026
spot_img
Home गुन्हेगारी वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली कुवारबाव येथील महिलेची १० लाखांची फसवणूक

वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली कुवारबाव येथील महिलेची १० लाखांची फसवणूक

रत्नागिरी:- वर्क फ्रॉम होमची नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची सुमारे १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार रत्नागिरी शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुवारबाव येथील वृंदावन सोसायटीमध्ये राहणाऱ्या रोहिणी मंदार गीते (४५) यांची ८ मे २०२५ ते २७ मे २०२५ या कालावधीत ही फसवणूक झाली आहे. अज्ञात आरोपींनी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया ॲपवर ‘स्केचर्स’ कंपनीत वर्क फ्रॉम होमच्या कामाची जाहिरात दिली होती. या जाहिरातीला प्रतिसाद दिल्यानंतर आरोपींनी रोहिणी गीते यांच्याशी टेलिग्राम अकाऊंटवरून संपर्क साधला.

सुरुवातीला आरोपींनी काही कस्टम ऑर्डरसाठी रोहिणी गीते यांच्याकडून पैसे भरून घेतले आणि त्याबदल्यात त्यांना योग्य परतावा दिला. यामुळे विश्वास बसल्यानंतर, गीते यांनी बँक ऑफ इंडिया आणि डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या खात्यांमधून एकूण ९ लाख ९६ हजार ९९१ रुपये आरोपींच्या खात्यात जमा केले. मात्र, यानंतर आरोपींनी गीते यांना कोणताही परतावा दिला नाही, तसेच गुंतवलेली रक्कमही परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रोहिणी गीते यांनी पोलिसांत धाव घेतली.

याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात ६ जून रोजी तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार एका महिला आरोपीसह प्रवीण नावाच्या व्यक्तीवर आणि इतर अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.