लांजा पोलिसांत पाच जणांवर गुन्हा दाखल
लांजा:- तालुक्यातील पालू कुंभारवाडी येथे घर परसवातील जमिनीच्या हद्दीवरून शेजाऱ्यांमध्ये जुना वाद उफाळून आला असून, चिव्याच्या काठ्या आणि खुर्चीने केलेल्या मारहाणीत एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात पाच संशयितांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पालू कुंभारवाडी येथील रहिवासी असलेले साळवी आणि देवळेकर कुटुंबीय शेजारी राहतात. त्यांच्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून घरासमोरील परसवाच्या जागेवरून वाद सुरू होता. या वादावर तोडगा काढण्यासाठी फिर्यादी पक्षाने मंगळवारी जमिनीची शासकीय मोजणी करून घेतली. या मोजणीदरम्यान फिर्यादींची जागा संशयितांच्या हद्दीत, तर संशयितांचे सुमारे अर्धे घर फिर्यादींच्या जागेत येत असल्याचे समोर आले. याच कारणाचा राग मनात धरून संशयितांनी फिर्यादींच्या घराजवळ जात शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर वादावर सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी गेलेले साक्षीदार नामदेव साळवी यांना संशयितांनी प्लॅस्टिकच्या खुर्चीने डोक्यात मारहाण करून दुखापत केली. त्यांना सोडवण्यासाठी फिर्यादी स्नेहल साळवी, त्यांचे वडील मनोहर साळवी आणि आई मधुरा साळवी धावून गेले असता, संशयितांनी चिव्याच्या काठ्यांनी व लाथाबुक्क्यांनी चौघांनाही बेदम मारहाण केली.
या प्रकरणी स्नेहल मनोहर साळवी यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी चंद्रकांत धोंडू देवळेकर, दिनेश धोंडू देवळेकर, सत्यवान धोंडू देवळेकर, प्रभात दिनेश देवळेकर आणि सचिन सत्यवान देवळेकर (सर्व रा. पालू कुंभारवाडी, ता. लांजा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, पोलीस अंमलदार शेडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









