गाडी पार्किंगवरून वाद ; दीर, सासऱ्याविरोधात गुन्हा
लांजा:- घरासमोर गाडी उभी करण्यावरून वादातून महिलेला शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी देत कोयतीने मारहाण केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी दीर आणि सासरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशा दिलदार थोडगे (वय ३०, रा. कोर्ले, मुस्लिमवाडी, ता. लांजा) यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आयशा थोडगे व त्यांचे दीर मुबारक इब्राहिम थोडगे (वय ४५) आणि सासरे इब्राहिम युनुस थोडगे (वय ७०) हे एकाच घरात विभक्त राहतात. त्यांच्यामध्ये घरगुती वाद आहेत. ६ जून रोजी सायंकाळी आयशा थोडगे यांचे पती दिलदार इब्राहिम थोडगे हे चिपळूणवरून घरी आले होते आणि त्यानंतर त्यांनी मोटार घरासमोर उभी केली होती. त्यावेळी मुबारक थोडगे आणि इब्राहिम थोडगे या पिता-पुत्रांनी दिलदार थोडगे यांना तू इथे गाडी लावायची नाहीस. असे सांगितले. मात्र दिलदार थोडगे यांनी गाडी इथेच लावणार, असे सांगितले. त्याचा राग घेऊन मुबारक व इब्राहिम यांनी त्यांच्या गाडीच्या काचेवर हात मारून शिवीगाळ केली. तेव्हा आयशा घराबाहेर आल्या. मुबारक थोडगे कोयती घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेला. त्या वेळी आयशा यांनी बचावासाठी हातामध्ये आणला. त्यामुळे त्या जखमी झाल्या. याप्रकरणी दीर सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.









