दोघांवर गुन्हा, पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
लांजा:- लांजा ते दाभोळे मार्गावरील कुरचुंब फाटा येथे पिकअप टेंपोतून दोन बैलांची दाटीवाटीने व नियमांचे उल्लंघन करून वाहतूक केली जात असल्याचा प्रकार लांजा पोलिसांनी उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी दोन बैलांची सुटका करून पिकअप वाहनासह एकूण २ लाख ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सत्यजित गंगाराम कोलापटे (वय २३, रा. आंबा मानोलीजवळ धनगरवाडी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) आणि सुरेश धोंडीबा बरागडे (वय ३३, रा. चांदोली, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यातील सुरेश बरागडे याच्याविरुद्ध यापूर्वीही देवरूख पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ आणि बेकायदेशीर वाहतुकीसंदर्भात गुन्हा दाखल असल्याची नोंद पोलिसांकडे आहे.
लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी कळंत्रे हे पोलीस पथकासह गस्तीवर असताना लांजा-दाभोळे मार्गावरील कुरचुंब फाटा येथे बोलेरो पिकअप क्रमांक एमएच ०९ जीजे २८२५ संशयास्पदरीत्या जाताना दिसली. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता, वाहनाच्या हौद्यामध्ये दोन बैल अत्यंत दाटीवाटीने बांधून ठेवल्याचे आढळून आले. बैलांना हालचाल करता येऊ नये अशा पद्धतीने आखूड दोरीने बांधण्यात आले होते. तसेच वाहनाचा हौदा चारही बाजूंनी ताडपत्रीने बंद करण्यात आला होता. त्यामुळे जनावरांसाठी पुरेशी हवा खेळती राहण्याची व्यवस्था नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
वाहतुकीदरम्यान जनावरांना दुखापत होऊ नये यासाठी वाहनात आवश्यक पार्टीशन करण्यात आलेले नव्हते. तसेच बैलांसाठी चारा-पाणी आणि प्रथमोपचाराची कोणतीही व्यवस्था नसल्याचे आढळून आले. जनावरांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक प्रमाणपत्र घेण्यात आलेले नव्हते, तसेच वाहनावर गुरे वाहतूक करीत असल्याचा आवश्यक फलकही लावण्यात आलेला नव्हता. त्यामुळे संबंधित वाहतूक नियमबाह्य पद्धतीने केली जात असल्याचे पोलिसांच्या तपासणीत स्पष्ट झाले.
या कारवाईत प्रत्येकी १० हजार ५०० रुपये किमतीचे दोन बैल आणि २ लाख ५० हजार रुपये किमतीचा बोलेरो पिकअप टेम्पो असा एकूण २ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी कळंत्रे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा, प्राण्यांची वाहतूक नियम, मोटार वाहन कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) नुसार दोन्ही संशयितांना नोटीस बजावण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल यू. यू. शेडे करीत आहेत.









