Sunday, November 15, 2026
spot_img
Home गुन्हेगारी राजापूर होळी येथे कौटुंबिक वादातून मारहाण

राजापूर होळी येथे कौटुंबिक वादातून मारहाण

दोन प्रकरणात नाटे सागरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद

राजापूर:- किरकोळ कारणांवरून घरातीलच नात्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडून मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्यांपर्यंत वाद पोहोचल्याच्या दोन घटना राजापूर तालुक्यातील होळी परिसरातून समोर आल्या आहेत. एकाच कुटुंबातील दोन स्वतंत्र घटनांमध्ये सख्ख्या भावाने भावाला, तर दिराने भावजयीला मारहाण करून अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या दोन्ही प्रकरणी नाटे सागरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पहिली घटना मंगळवारी (११ नोव्हेंबर) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास होळी येथील रस्त्यावर घडली. समीर विजय शिरवडकर (वय ४५) हे आपल्या पाळीव कुत्र्याला फिरवत असताना त्यांचा भाऊ शशांक विजय शिरवडकर (वय ३८) हे मोबाईलवर कोणाशी तरी संभाषण करत होते. या संभाषणादरम्यान ‘माझ्याकडे हत्यार आहे…” असे बोलणे समीर यांच्या कानावर पडले. त्यामुळे त्यांनी शशांक याच्याकडे कोणाला बोलतोस, तुझ्याकडे कोणते हत्यार आहे, अशी विचारणा केली. मात्र, या साध्या विचारण्याचाही राग अनावर झालेल्या शशांक यांनी समीर यांना हाताचे थापटाने मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता अश्लील शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार समीर यांनी पोलिसांकडे केली आहे.

दुसरी घटना याच दिवशी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास होळी भंडारवाडी येथे घडली. साक्षी शशांक शिरवडकर (वय ४०) या घरी असताना त्यांचा दीर समीर विजय शिरवडकर याने कोणतेही कारण नसताना आई-बहिणीवरून अश्लील शिवीगाळ केली. तसेच हाताच्या थापटाने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी साक्षी यांनी १२ नोव्हेंबर रोजी नाटे सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दोन्ही तक्रारींच्या आधारे पोलिसांनी संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५२, ३५१(२)/३५१(३) आणि ११५(२) अन्वये स्वतंत्र अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. किरकोळ कारणांवरून घरातीलच नात्यांमध्ये मारहाण आणि धमक्यांचे प्रकार घडल्याने होळी परिसरात चर्चेला उधाण आले आहे.